CHNDRAPUR । 18 April 2023
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. याची भीषणता ही नियमितच्या चार-आठ दिवसाकाठी होणार्या वाघांच्या हल्ल्याने स्पष्ट झाली आहे.
कधी जंगला शेजारी तर कधी थेट गावात, घरात घुसून वाघ माणसांना सावजाप्रमाणे ठार करतांना दिसतो आहे.
सद्याच्या अती कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक रात्री अंगणात झोपी जातात. परंतू स्वतःच्या घरातील अंगणातच काळ घात करेल असे कोणाला वाटेल?
अशीच एक दुर्दैवी घटना जिल्ह्यातील सावली (Saoli) तालुक्यामध्ये येणाऱ्या विरखल या गावी परवादिवशी (सोमवार) च्या मध्यरात्री उघडकीस आली. अंगणात खाटेवर झोपलेल्या एका ५३ वर्षीय वृद्ध महिलेवर मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला (tiger Attack) करून ठार केले.
मंदा एकनाथ सिडाम असे मृत महिलेचे नाव आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला मंदा एकनाथ सिडाम ह्या सोमवारला स्वतःच्या घराच्या अंगणात झोपलेल्या असताना, मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने गावात प्रवेश करून अंगणात झोपलेल्या मंदा यांच्यावर एकाऐक हल्ला चढवला आणि जागीच ठार केले.
वाघाने हल्ला केल्यानंतर मंदा यांनी प्रचंड आरडाओरड केली, त्यामुळे शेजारी धावून आले. नागरिकांच्या कल्लोळाने वाघाने गावातून धूम ठोकली. परंतु तोपर्यंत मंदा यांचा मृत्यू झालेला होता.
सदर घटनेची माहिती सावलीचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर यांना देण्यात आली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.
जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे.
चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यात वर्षभरात ५३ जणांचा वाघाने बळी घेतला आहे. त्यामध्ये एकट्या सावली तालुक्यातील २० जणांचा समावेश आहे. आठवडाभरापूर्वीच सावली तालुक्यातील ०५ वर्षाच्या हर्षल नावाच्या चिमुकल्याला वाघाने आपला शिकार केला होता. ही घटना ताजी असतानाच घरात घुसून झोपलेल्या वृद्ध महिलेचा जीव गेल्याने परीसरात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.