बिएडचे बोगस प्रमाणपत्र जोडून शासनाची दिशाभूल करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कारवाईची मागणी
CHNDRAPUR । 16 April 2023
जिल्हा परिषद चंद्रपूर (zilla parishad chandrapur) अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकांनी पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती मिळविण्यासाठी सन २००५ ते २०१२ या कालावधीत अनेक शिक्षकांनी बिएड अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे शिक्षक बिएड (B.ed)अभ्यासक्रमाच्या कालावधीत शाळेतल्या हजेरी पटावर उपस्थिती लावून वेतन उचल केल्याची गंभीर बाब उजेडात आल्याने इतर अन्यायग्रस्त शिक्षकांच्या संघटनेने आणि माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचे राज्याध्यक्ष तुळशीराम जांभुळकर तसेच सोसायटी फॉर फास्ट जस्टीसने पुराव्यानिशी लेखी तक्रार केली. त्याबरोबरच जिल्हा परिषद चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेशी वारंवार मौखिक चर्चा करून सुद्धा शिक्षणाधिकारी लोखंडे अद्यापही कोणतीही कारवाई किंवा साधी चौकशीही केली नसल्याने बोगस बिएड धारक शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांचेच अभय असल्याचे दिसून येते आहे.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपणे चौकशी करून दोषी शिक्षणाधिकाऱ्यांसह “त्या बोगस शिक्षकांवर” कारवाई करण्याची मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस ने केली आहे.
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकांनी सन २००५ ते २०१२ या वर्षात पदवीधर शिक्षक होण्याच्या लालसेपोटी तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून अटी शर्थीचे उल्लंघन करीत आपल्या सेवा काळात बिनवेतनी रजेवर राहून बिएड करण्याचे शासनाचे निर्देश डावलून आपआपल्या शाळेत शिक्षण कालावधीत शंभर टक्के उपस्थिती दर्शवून नियमित वेतन घेत बिएड पूर्ण केले.
या शिक्षणासाठी त्यांनी जिल्हा परिषदेची परवानगी घेतली नाही. (हे विशेष) अशा चुकीच्या पद्धतीने शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन पदोन्नती घेतल्याने शासनाने त्यांना पदोन्नतीही दिली आहे. परंतू प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन शासनाचे दिशानिर्देश पाळत बिएड करणाऱ्या शिक्षकांवर प्रशासनाकडून एकप्रकारे अन्याय करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकारासंदर्भात अनेक शिक्षक संगटनांनी शासन स्तरावर पुराव्यानिशी तक्रारी करून न्यायाची अपेक्षा ठेवली, परंतू जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांची साधी दखलही घेतली नाही.
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या संगटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष तूळशीराम जांभुळकर यांनी शिक्षणाधिकारी लोखंडे यांची भेट घेऊन पुराव्यानिशी तक्रार दिली. परंतू कायद्याने भान विसरून बसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली.
माहितीच्या अधिकारात शिक्षण विभागाला माहिती मागितली असता ती ही पुरविली जात नाहीये. ही बाब चंद्रपूर जि. प. च्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
या बोगस बिएड शिक्षकासंबंधी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षण समितीकडून कारवाई करण्याचा ठरावही घेण्यात आला होता, या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. परंतु अद्यापही शिक्षण विभागाने कोणतीही चौकशी वा कारवाई केली नाही.
त्यामुळे सोसायटी फॉर फास्ट जस्टीसने दि. १७ जानेवारी २०२३ ला शिक्षणमंत्री दिपक केसरकर, मुख्य सचिव तसेच शिक्षण सचिव रणजितसिंग देओल यांचेकडे शासनस्तरावर लेखी तक्रार दाखल करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) लोखंडे यांचेवर कारवाई करण्याचे पत्र दिले. शासनाने ही या गंभीर प्रकरणाची दखल घेत चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे.
असे असताना सुद्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अद्यापही कोणतीच चौकशी व कारवाई केली जात नाहीये, ही कायद्याची पायमल्ली नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या बोगस बिएड करणाऱ्या शिक्षकांनी शासनाच्या करोडो रुपयाची लूट केली आणि काहींनी अपंग नसतांना सुद्धा बनावट प्रमाणपत्र जोडून शासनाची आर्थिक लूट केली आहे. शिक्षकी पेशाला कलंकीत करणाऱ्या अशा शिक्षकांविरुद्ध वारंवार तक्रारी करूनही साधी चौकशी होत नाही हे अतिशय गंभीर आहे. या संपुर्ण प्रकरणामध्ये नेमकी कुठे माशी शिंकत आहे? याचा तपास करून आपल्या अधिकाराचा सर्रास गैरवापर करणाऱ्या शिक्षणाधिकारी लोखंडे यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी तसेच त्या बोगस 'बीएड'धारी शिक्षकांवर शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस च्या वतीने शासनस्तरावर करण्यात आली आहे.
#Chandrapur #ZPchandrapur #EducationDept