Chandrapur : जिल्ह्यात अपूर्ण घरकुलाच्या बांधकामाकरीता विशेष मोहीम!

0

CHANDRAPUR | 21 MAY 2024
चंद्रपूर जिल्ह्यात रमाई, शबरी व मोदी आवास योजनेंतर्गत सन 2016 ते 2024 या कालावधीत अपूर्ण राहिलेल्या घरकुलांच्या बांधकामाकरीता 15 ते 31 मे दरम्यान विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे. जिल्ह्यात 26357 घरकुलांची कामे अर्धवट रखडली असल्याने ती पूर्ण करण्याकरीता 31 मे पर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आहे. याकरीता गृहनिर्माण अभियंता, स्थापत्य अभियंता, तालुका स्तरावर गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशा जवळपास 100 हून जास्त अधिकारी – कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अर्धवट घरकुलांची संख्या अधिक असल्याने बांधकाम पूर्ण करण्याबाबत शासनाकडून सुचना प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी खातेप्रमुखांनी ग्रामपंचायतींना भेट देऊन घरकुलांच्या बांधकामाची पाहणी केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये घरकुलांची कामे पूर्ण करण्याकरीता ॲक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. सन 2016-17 ते 2023-24 या दरम्यान राज्य पुरस्कृत रमाई घरकुल 6284, शबरी 9260 व मोदी आवास योजनेंतर्गत 10813 असे एकूण 26357 घरकुलांची कामे अर्धवट रखडलेली आहेत. ती पुर्ण करण्याकरीता गावस्तरावर 15 ते 31 मे या 15 दिवसात विशेष मोहीम घेतली जात आहे. यामध्ये 45 ग्रामीण गृहनिर्माण अभियंतासह स्थापत्य अभियंता, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी आदींचा समावेश आहे.


15 दिवसात अर्धवट घरकुलांची कामे मार्गी लावण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. तर जिल्ह्यात अर्धवट घरकुलांची संख्या पाहता खाते प्रमुखांकडून ग्रामपंचायतींना भेटी देण्यात आल्या आहेत. या मोहिमेद्वारे जास्तीत जास्त घरकुलांच्या कामांना गती येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !