▪️हे वेकोलिचे धक्के नाहीत! वेकोलिने फेटाळून लावले स्थानिकांचे तर्क...
चंद्रपूर, दि. १५ जानेवारी २०२३.
शहरातील बाबूपेठ परिसरात आज रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जमीनीला अचानक हादरे जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जमीनीच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे भुकंपाच्या सौम्य धक्क्यांचा हा प्रकार असल्याची शक्यता परिसरातून वर्तवण्यात येत आहे.
स्थानिकांच्या मते, या भागात असणार्या वेकोलिच्या खाणीमध्ये सुरुंग स्फोट केल्याने आजूबाजूला भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याचे बोलल्या जात आहे. परंतू प्रशासन किंवा भुगर्भ संशोधकांकडून याबाबतीत अधिकृत अहवाल येईपर्यंत आज अचानक हादरे बसण्याचे कारण अनुत्तरित आहे.
तरीही वेकोलिच्या खाणींनी वेढलेल्या चंद्रपूरकरांसाठी हे हादरे “हादरवणारेचं” आहेत. यात शंका नाही. अलीकडेच जवळच असलेल्या घुग्घुस येथील अमराई वार्डात भुस्खलन होऊन उभे घर जमीनीत गाडल्या गेले होते. त्यामुळे बाबूपेठ (चंद्रपूर) परिसरातील नागरिकांसह शहरातील इतर भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे वेकोलिचे धक्के नाहीत..!!
वेकोलिच्या सुरुंग स्फोटामुळे सदर धक्के बसल्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिकांनी वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, “इतक्या रात्री वेकोलि खाणीत सुरुंग करत नाही.” असे म्हणत वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांची शक्यता फेटाळून लावली.
प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ व भूगर्भ अभ्यासक डॉ. सुरेश चोपणे यांनी यासंदर्भात बोलताना, चंद्रपूर शहराच्या चारही बाजूंनी वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. या खाणींमध्ये सुरुंग स्फोट केल्या जात असतात. यासोबतच काही भूमिगत खाणी बंद करण्यात आल्या असल्या तरीही त्या योग्य पद्धतीने बुजविण्यात आल्या नसल्याने जमिनीत अनेक जागी पोकळी निर्माण झाली आहे. भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे या बंद खाणीतील मोठा भाग अंतर्गत कोसळला असल्याने सदरहू हादरे जानवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#Chandrapur #Babupeth #earthquake