Chandrapur : मला निवडून दिल्यास, आनंदाच्या शिद्यासह दारू!

0

चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार वनिता राऊत यांचा अजब आश्वासन..
CHANDRAPUR | 31 MARCH 2024
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येत्या 19 एप्रिल रोजी म्हणजे पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभेसाठी (Chandrapur Loksabha) मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार सामान्यतः अनेक विकासकामे करण्याचे आश्वासन देत असतात. मात्र चंद्रपूरातील एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने सर्वांनाच आश्चर्य झाले आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथे राहणाऱ्या आणि अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत (Vanita Raut) यांनी हे अनोखे आश्वासन दिले आहे. चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 15 उमेदवारांमधील त्या एक आहेत. वनिता राऊत यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार झाल्यास त्यांच्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधासह दारू व बियरची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.
विशेष म्हणजे, याआधी वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवत मद्यप्रेमींबद्दलची आपली तळमळ आश्वासनाच्या रुपात मतदारांपुढे ठेवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. देशाचे भाग्य ठरवणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक! देशाशी निगडित जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर उमेदवार सभेची मैदानं गाजवत असतात. मात्र वनिता राऊत यांनी दिलेल्या आश्वासनांची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आहे.

दारिद्र्य रेषेखाली लोकांना बिअर, व्हिस्की मिळावी - वनिता राऊत
"मागच्या विधानसभा निवडणुकीत मी चिमूर मतदारसंघातून उभी होती. दारुचा विषय यासाठी घेतला कारण चंद्रपूरात बंदी आहे आणि नागपुरात नाही. चंद्रपूरच्या लोकांनी कोणतं पाप केलं आहे. चंद्रपूरचे लोक कायदेशीर मार्गाने दारु पिऊ शकत नाही आणि नागपुरातील पिऊ शकतात. त्यासाठी मी चंद्रपुरातून दारु बंदी हटवण्याचा विषय मांडला होता. दारुबंदी हटवण्यात आली आहे पण माझे जे काही मुद्दे राहिले होते ते म्हणजे बिअर बार, बेरोजगारांना दारु विक्रीचे परवाने, जे दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना रेशन कार्डवर बिअर, व्हिस्की मिळावी. या राहिलेल्या मागण्या मी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे."

आनंदाचा शिधासोबत बिअर द्या - वनिता राऊत
"सरकार सणासुदीला आनंदाचा शिधा देतं. त्या आनंदाच्या शिधासोबत सरकारने गोरगरिबांना भारी भारी ब्रॅण्डच्या बिअर, व्हिस्की द्याव्यात. जरी सरकारने हे नाही दिलं तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार बनवलं तर... खरंच सांगते की माझ्या खासदार निधीतून दारु पिणाऱ्या गोरगरिब लोकांना आनंदाच्या शिधासोबत बिअर, व्हिस्की देण्याचे आश्वासन देत आहे," असेही उमेदवार वनिता राऊत म्हणाल्या.

#ChandrapurLoksabha #Chandrapur #VanitaRaut

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !