राज्य शासनाकडून सन्मान, ग्रामपंचायतीने केले पुरस्काराचे वितरण..
SINDEWAHI । 31 MAY 2023
विविध क्षेत्रांत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून सेवा देणाऱ्या महीलांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने राज्यातील अनेक कर्तुत्ववान महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या महिलांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील मौजा रत्नापूर (नवरगांव) च्या सुनिता दिलीप मेश्राम यांचाही समावेश आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सुनिता मेश्राम यांच्या सामाजिक जिवनातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
आज (दि. ३१ मे) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सुनिता दिलीप मेश्राम यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुनिता दिलीप मेश्राम यांनी यशस्वी महीला स्वयंसहायत्ता समुहाच्या संघटक म्हणून पञावळी निर्मीतीचा गृहउद्योग सुरू केला. आणि परीसरातील महीलांना उद्योगाभिमुख करण्यास सुरुवात केली. याशिवाय कर्जाची नियमीत परतफेड करुन जिल्हा ग्रामीण यंञणा विभागीय कार्यक्रमांतर्गत २०१७ मध्ये आपल्या स्वयंसहाय्यता समुहाला शिल्ड, प्रमाणपञ, पुष्पगुच्छ तसेच पाच हजार रुपयांच्या रोख रकमेसह सिंदेवाही तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळवुन दिला. गृह तसेच छोट्या-छोट्या उद्योगांच्या माध्यमातून महीलांना आर्थिक साक्षर करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
जवळपास ९० महीला असलेल्या एका सामाजिक मंडळाच्या त्या मागील पंधरा वर्षांपासून कोषाध्यक्ष असून महीला सक्षमीकरणासाठी त्या निरंतर प्रयत्नशील आहेत.
समाजशास्त्रात एम. ए. असलेल्या रत्नापुरच्या सुनिताताई स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यामध्ये अग्रणी असून बालविवाह, हुंडापध्दती निर्मुलन, घरगुती हिंसा यावर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, तंटामुक्त गाव समीतीच्या माध्यमातून महीलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर महीलांचे समुपदेशन, योग्य सल्ला व मार्गदर्शन करणे, महिलांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम त्यांचेकडून आजतागायत सुरू आहे. निरंतर शिक्षण केंद्राच्या माध्यमातूनही सहाय्यक प्रेरक म्हणून शाळाबाह्य, निरक्षर मुलामुलींना केंद्रात बोलावून शिक्षणाच्या प्रवाहात सामील करुन साक्षर बनविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अशाच अनेक सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच रत्नापूर ग्रामपंचायतीकडून सरपंच कविता सावसाकडे, उपसरपंच अशोक गभणे यांचेहस्ते त्यांना आज पुरस्कार प्रदान केले.
प्रशस्तीपञ, सन्मानचिन्ह व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी ग्रामविकास अधिकारी नरेंद्र वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य माया लोधे, इमरान पठाण, वासुदेव दडमल, प्रविण कामडी, रजनी काऊलकर, नजरी मेश्राम, उषा धारणे, हेमलता सोनटक्के आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.