SINDEWAHI । 8 May 2023
येत्या ११ मे रोजी संपुर्ण देशभर पत्रकारांचे त्यांच्या न्यायिक हक्कासाठी आंदोलन होणार असून सिंदेवाहीत सुद्धा याचे पडसाद उमटणार आहेत.
स्थानिक पातळीवरील पत्रकारांकडुनही सिंदेवाही तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध उपविभागीय कार्यालये तसेच तहसील कार्यालयांसमोर ३ तासाचे धरणे आंदोलन होणार असून या आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्यायिक हक्कांच्या पुर्ततेसाठी अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये, १)पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.
२) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्णवेळ काम केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.
३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेली जीएसटीची अट रद्द करावी.
४) पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
५) कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम ( ब वर्ग) दैनिकां इतक्याच त्याप्रमाणात जाहिराती देण्यात यावे. या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
सदर आंदोलन ११ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार असून या आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नसून निषेधार्थ काळ्या फितीही लावण्यात येणार नाही. आंदोलनाच्या दर्शनी भागात आंदोलनाचे बॅनर असेल. पत्रकार मंडळीचे एकत्रीकरण आणि भाषणे यांचा समावेश या धरणे आंदोलनात असेल.
आंदोलनाला आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय सामाजिक कार्यकर्ते भेट आणि पाठिंबा देतात काय हे तपासून पाहण्यात येईल. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना ही निवेदन देण्यात येणार आहे.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाला तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर, होणाऱ्या आंदोलनाच्या परवानगीसाठी व्हाईस ऑफ मिडीया (voice of media) शाखा सिंदेवाहीच्या वतीने तहसिलदार एन. एस. रंगारी व ठाणेदार सिंदेवाही यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी, तालुका व्हाईस ऑफ मिडीयाचे अध्यक्ष दयाराम फटिंग, जिल्हा सदस्य अमर बुद्यारपवार, उपाध्यक्ष शशिकांत बदकमवार, उपाध्यक्ष खालिद पठाण, संघटक वहाब अल्ली सय्यद , कार्यवाहक अरुण माधेशवार, कोषाध्यक्ष प्रशांत गेडाम हे उपस्थित होते.