प्रांताध्यक्षांची कारवाई, जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी!
CHANDRAPUR । 04 MAY 2023
चंद्रपूर जिल्ह्यात पार पडलेल्या कृषि उत्पन बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील अनेक बाजार समितींबरोबरच विशेषतः चंद्रपूर कृ.उ.बा.स. मध्ये भाजप समर्थीत शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलशी उघड-उघड युती करून कॉंग्रेसच्याच दुसऱ्या गटाचा दारुण पराभव केल्याचा ठपका ठेवून जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
तशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे (Maharashtra Pradesh Congress Committee) प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
शनिवारी (२९ एप्रिल) रोजी जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन बाजार समित्यांचे निकाल लागले. परंतू या संपूर्ण निकालांत चंद्रपूर बाजार समितीच्या निकालाची सर्वदूर चर्चा झाली. ती यामुळे की या निकालानंतर कॉंग्रेस आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी एकत्र येऊन गुलाल उधळत केलेला आनंदोत्सव..
कॉंग्रेसच्याच दुसऱ्या पॅनलचा १२-०६ अशा मोठ्या फरकाने पराभव करत मुनगंटीवार-वडेट्टीवार गटाचा विजय झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या याबरोबरच खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का अशीही ब्रेकिंग त्या दिवशी सर्वत्र पहायला मिळाली. या जल्लोषात विजयी उमेदवारांसह भाजप व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एकत्र नाचतांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतू परीवर्तनाच्या बाजूने आम्ही उभे आहोत अशी प्रतिक्रिया देत देवतळे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
मात्र, या संपूर्ण प्रकराची नोंद घेऊन प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा कॉंग्रेस कमेटीला चांगलेच खडसावले आहे.
देशपातळीवर माजी खासदार राहुल गांधी हे भाजपविरोधात मोट बांधत असतांना चंद्रपूरात अशी अभद्र युती होणे म्हणजे पक्षशिस्तीला धरून नाही. या प्रकारामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला त्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पक्षादेशाची अवहेलना केल्याचे सांगत त्यांना पदमुक्त करण्यात येत आहे. तसेच नवीन नियुक्ती होईपर्यंत शहर कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामु) तिवारी हे ग्रामीण जिल्ह्याचा प्रभार सांभाळतील अशी माहिती त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात दिली आहे.
त्यामुळे चंद्रपूर बाजार समीतीत भाजपसोबत केलेली युती आणि डान्स प्रकाश देवतळे यांना चांगलाच महागात पडल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
प्रांताध्यक्ष नाना पटोलेंचे सदर पत्र प्राप्त होताच जिल्ह्यातील एका कॉंग्रेसी गटाला आनंद झाल्याचे चित्रही दिसून येत आहे. शिवाय खासदार बाळू धानोरकर यांनी शहर कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामु) तिवारी यांचे पुढील प्रभाराकरीता अभिनंदनही केले आहे.