Chimur : राजीव गांधींच्या स्मृतीदिनी मटणावर ताव!

0


कॉंग्रेसलाचं राजीव गांधीचा विसर ? 

CHADRAPUR । 22 MAY 2023 
आधुनिक भारतात तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून देशाच्या भविष्याचा पाया रचणारे तसेच देशाच्या संगणक क्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाणारे, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा (काल २१ मे) रोजी ३२ वा स्मृतीदिन होता. परंतू त्यांचा स्मृतीदिनाचा विसर त्यांच्याच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पडल्याने चिमूर (Chimur) तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांसह मटणावर ताव मारल्याची अजब घटना समोर आली आहे. 


आगामी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता वर्षभरावर येऊन ठेपल्याने सद्या सगळीकडेच स्थानिक 'भावी नेत्यांकडून' पक्षाला आपली ताकद दाखविण्याच्या दृष्टीने ना-ना प्रयत्न सुरू आहेत. अशातच चिमूर तालुक्यातील खडसंगी-मासळ जि. प. क्षेत्रातील कॉंग्रेसचे नेते दिवाकर निकुरे यांनी खडसंगी (ताडोबा रोड) येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले.
तो दिवस होता २१ मे राजीव गांधी यांच्या ३२ व्या स्मृतिदिनाचा! 
परंतू चमकोगीरीच्या नादात याठिकाणी जमलेल्या कॉंग्रेस नेत्या-कार्यकर्त्यांना हे ही समजले नाही की आज राजीव गांधी यांचा स्मृतिदिन आहे. आणि मेळावा संपताच सार्‍यांनी बोकडाच्या मटणावर ताव मारला.


कमाल म्हणजे याठिकाणी दस्तुरखुद्द कॉंग्रेसच्या आदिवासी सेलचे प्रांताध्यक्ष आणि गडचिरोली विधानसभेचे माजी आमदार नामदेव उसेंडी, प्रांत सचिव पंकज गुड्डेवार यांचीही उपस्थिती होती. लहानग्यांना नाही पण मोठ्या नेत्यांनाही राजीव गांधींच्या स्मृतिदिनाचे भान राहीले नाही काय? आजच्याचं दिवशी त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने सबंध देश हळहळला होता, परंतू विधानसभेच्या तिकीटीची आस लावून बसलेल्या युवा नेत्यांना हे ही समजू नये? असे एकनाकेक प्रश्न आता कॉंग्रेसच्याच एका गटाकडून विचारले जावू लागले आहेत. 


अलीकडेच चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपशी युती केल्याच्या कारणावरून कॉंग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचेंवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता “मटणावर ताव मारणाऱ्या या नेत्या-कार्यकर्त्यांवर” पटोलेंकडून काही कार्यवाही केली जाते काय? हे पाहणे औचित्याचे असणार आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !