Editorial। 13 March 2023
आजच्याचं दिवशी १९४० सालची गोष्ट!
लंडनमधल्या कॅक्स्टन हॉलमध्ये (caxton hall) ब्रिगेडियर जनरल सर पर्सी साईक्स (Brigadier-General Sir Percy Molesworth Sykes) यांचे अफगाणिस्तानबद्दल भाषण चालले होते. भाषण आटोपल्यानंतर भारतमंत्री लॉर्ड झेटलंड यांनी कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमाला मुंबईचा पूर्वीचा गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन आणि पंजाबचा पूर्वीचा गव्हर्नर सर लुईस डेन हे सुद्धा उपस्थित होते.
याच कार्यक्रमस्थळी अजून दोन लोक उपस्थित होते, ते म्हणजे पंजाबचा पूर्वीचा एक गव्हर्नर सर मायकेल ओ’ड्वायर आणि ‘मोहम्मद सिंग आझाद’ म्हणजे हे नाव धारण करून आलेले थोर भारतीय क्रांतिकारी उधम सिंग! (Udham Singh)
कसे-बसे पैसे जमवून फक्त जालियनवाला बाग हत्याकांडाचा (Jallianwala Bagh massacre) बदला घेण्यासाठी लंडनमध्ये आलेल्या उधम सिंग यांनी लंडनमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी अनेक फुटकळ कामे केली. गाड्या दुरुस्त करणे, रंगारीकाम, सुतारकाम वैगरे-वैगरे.
त्यांच्यातील अनेकांना माहिती नसलेले एक गुण म्हणजे त्यांना अभिनयाचेही अंग होते. त्यांनी लंडनमध्ये असताना ‘द फोर फेदर्स’ व ‘एलिफंट बॉय’ या दोन इंग्रजी चित्रपटांत देखील काम केला होता. पण हे सगळं वरवरचं होतं. खरेतर उधम सिंगांचा लंडनला यायचा मूळ हेतू जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणे हाच होता! ते फक्त योग्य संधीची वाट पहात होते.
कॅक्स्टन हॉलच्या सभेचं निमंत्रण त्यांना मिळालं. मग त्यांनी तयारी सुरु केली. बोर्नमाऊथला (Bournemouth) जाऊन एका इंग्रज शिपायाकडून एक जुनं पिस्तूल आणि गोळ्या विकत घेतल्या. एका पुस्तकात त्या पिस्तुलाच्या आकाराची पोकळी बनवून त्यात ते लपवलं. सोबत खिशात एक चाकूही घेतला.
१३ मार्च रोजीच्या सभेला उधमसिंगांनी मोहम्मद सिंग आझाद (Ram Mohammad Singh Azad) हे नाव धारण करून मस्तपैकी सूट-बुट, टाय-ट्रिल्बी हॅट वैगरे घालून त्यावेळेसच्या टिपिकल इंग्रजी पोशाखात हॉलमध्ये ऐटीत एंट्री केली.
सुरवातीलाच वाचल्याप्रमाणे, साईक्सचे भाषण संपताचं त्यांनी पुस्तकातून पिस्तुल काढून धडाधडा सहा गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या ओ’ड्वायरला लागल्या आणि तो तिथेच गतप्राण झाला. दोन गोळ्या लॉर्ड झेटलंडला चाटून गेल्या. एक गोळी सर लुईस डेनच्या मनगटावर लागली तर एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टनच्या हाताला लागली. आणि तेवढ्यात दोन लोकांनी लगेच झडप मारून उधमसिंगांना पकडले.
पुढे लंडनमधल्या कोर्टात खटला चालला उधमसिंगांना ३१ जुलै १९४० रोजी लंडनमधल्या पेंटॉनव्हिले तुरुंगातच ( Pentonville Prison) फाशी झाली आणि त्यांचे प्रेतही तुरुंगाच्या आवारातच पुरले गेले.
फक्त न् फक्त जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी साता समुद्रापार इंग्लंडला जाऊन तब्बल २० वर्ष तयारी करणाऱ्या उधमसिंगांची आज २० सेकंद-इतके कशाला-०२ सेकंद आली तरी पुरे, नाही?
फोटो : १३ मार्च १९४० रोजी हातकड्या घालून पकडून नेले जात असतांना शहीद-ए-आज़म उधम सिंग
Shaheed-i-Azam Sardar Udham Singh