चांद्यात आजपासून आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल... CIFF

0


तीन दिवसांत १७ देशी – विदेशी चित्रपटांची रसिकांसाठी मेजवानी!

आज झळकणार ‘पंचक’ हा मराठी चित्रपट.. 


CHANDRAPUR । 11 MARCH 2023 
विदर्भ (Vidarbha) ही नैसर्गिक साधनसंपत्तीने विपूल असलेली भुमी आहे. सोबतच येथे वाघांचे अधिराज्य असल्यामुळे या भुमीतही चित्रपटांची निर्मिती व्हावी आणि येथील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात पहिल्यांदाच आजपासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे (CIFF) आयोजन होत आहे.


राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून १३ मार्च २०२३ या तीन दिवसांत चंद्रपूर येथील मिराज सिनेमा (Miraj Cinemas) एम.डी.आर. मॉल येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज सांयकाळी ०५ वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सदर फेस्टिवलचे उद्घाटन होणार असून ‘पंचक’ (PANCHAK) या मराठी चित्रपटाने फिल्म फेस्टिवलची सुरवात होणार आहे.
यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) चे माजी अधिष्ठाता समर नखाते हे ही उपस्थित राहणार आहेत.



स्थानिक भाषेतील चित्रपटांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांची निर्मिती कशी होते. ऑस्कर (Oscar) पुरस्कारासाठी निवडण्यात येणारे चित्रपटांचे विषय, त्यामागची प्रेरणा, त्याची मांडणी या सर्व बाबींची ओळख होऊन आपल्या भुमीतही फिल्म साक्षरता निर्माण व्हावी, हा या फेस्टिवलचा प्रमुख उद्देश आहे. तीन दिवसात देशी चित्रपटांसोबतच विदेशी चित्रपटांचीसुध्दा पर्वणी चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे.

तर दि. १२ आणि १३ मार्च ला प्रत्येकी आठ-आठ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण १७ देशी – विदेशी चित्रपटांची रेलचेल चंद्रपुरात राहणार आहे. १७ चित्रपटांमध्ये सहा भारतीय चित्रपट आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंचक, मदार (Madaar) आणि टेरीटरी या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. टेरीटरी (territory) हा मराठी चित्रपट वाघांच्या अधिवासावर आधारीत असून चंद्रपूर येथील सचिन मुल्यमवार व स्थानिकांनी हा चित्रपट बनविला आहे.


तर इतर तीन भारतीय चित्रपटांमध्ये निहारीका (बंगाली), टोरांज हजबंड (आसामी) आणि बिगीनिंग (तमीळ) यांचा समावेश आहे. तर विदेशी चित्रपटांमध्ये जर्मनी, फ्रान्स, कतार, चिली, अर्जेंटिना, पॅलेस्टाईन, कॅनडा, बेल्जीयम, डेन्मार्क आणि इराण या देशातील चित्रपट त्यांच्या मूळ भाषेत आणि इंग्रजी भाषेसह दाखविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व १७ ही चित्रपट अप्रदर्शीत आहेत. त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच चंद्रपुरच्या नागरिकांना या चित्रपटांचा आनंद लुटला येणार आहे.


त्यामुळे जिल्ह्यातील चित्रपट प्रेमींनी तीन दिवसीय फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !