🐬 उत्तम बाजारपेठ व उपजीविकेच्या साधनांच्या उपलब्धतेसह मच्छीमार समुदायाला कायम पाठबळ देण्याचे रिट्विट करीत केले आश्वासित!
CHANDRAPUR । 10 MARCH 2023
मागील आठवड्यात दि. ०४ मार्च रोजी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील उपलब्ध संधी व विविध मत्सव्यवसाय विषयक शासकीय उपक्रमांची माहिती जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिक क्षेत्रातील भागधारकांना मिळावी या उद्देशाने राज्याच्या मत्स्यव्यवसाय तथा सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली-चिमुर लोकसभेअंतर्गत येत असलेल्या सावली तालुक्यातील मौजा पेंढरी मक्ता या गावात मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
हे भव्य मत्स्य महोत्सव व कार्यशाळा स्थानिक एन. के. ॲक्वाकल्चर, मत्स्यबीज केंद्र, पेंढरीमक्ता याठिकाणी राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थाटात संपन्न ही झाले.
या महोत्सवामध्ये मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरीता मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील भागधारक जसे मत्स्यसंवर्धक, मत्स्यविक्रेता, मत्स्य बिजोत्पादक, मत्स्यखाद्य निर्मिती कंपनी, मत्स्यपालन सहकारी संस्था व त्यांचे सभासद तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच छत्राखाली एकत्रित आले होते.
याठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदान, तांत्रिक मार्गदर्शन, उपलब्ध संधीचा शोध, विविध शासकीय योजना, रोजगार निर्मिती तसेच बाजाराची उपलब्धता आदी उद्दिष्ट्यांवर त्यांना विस्तृत माहिती मिळाली. तसेच याठिकाणी बोलताना पालकमंत्री ना. मुनगंटीवारांनी मासेमारीला केवळ पोट भरणाचे साधन म्हणून न पाहता मत्स्यव्यवसाय करून व्यावसायिक दृष्टिने याकडे पाहण्याची आवश्यकता आहे असे नमूद केले. तर पुढे बोलताना मत्स्यव्यवसायाच्या उत्थानासाठी शासन कटीबद्ध असून लवकरच मागेल त्याला मत्स्य तळे ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हा महोत्सव पार पडल्यावर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी काल सदर महोत्सवाच्या कार्यक्रमाचे ट्विट (tweet) ट्विटर या समाजमाध्यामावर केले. आणि त्याची तातडीने दखल घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
पंतप्रधान मोदींनी सदर ट्वीटला “आपल्या मच्छीमार समुदायाला आपण कायम पाठबळ देत राहू आणि त्यांना उत्तम बाजारपेठ आणि उपजीविकेची साधणे मिळत राहतील हे सुनिश्चित करू” अशा आशयाचे रीट्वीट केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषतः गडचिरोली-चिमुर सारख्या अतिदुर्गम लोकसभा क्षेत्रातील एका अभिनव कार्यक्रमाची दखल खुद्द देशाच्या पंतप्रधानाने घेतल्याने परीसरातील मत्स्यसंवर्धक व शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हे ही वाचा 👇👇
यापुर्वी या भागातील मत्स्यव्यवसाय करणारे शेतकरी अल्प प्रमाणात मत्स्यबीज घेण्यासाठी बाजुच्या छत्तीसगड राज्यापर्यंत ६ तासांचा प्रवास करत होते. या धकाधकीच्या प्रवासात कधी बिज मृत व्हायचे तर कधी शेतकऱ्यांना भेसळयुक्त (मिश्र) मत्स्यबीज दिल्याने मत्स्य उत्पादकांचे मोठे नुकसान देखील होत होते. परंतू केंद्र सरकारने आपल्या लोककल्यारी कार्यक्रमांतर्गत
पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सुरू केल्याने नजीकच्या गडचिरोलीमधेच हॅचरी उभारण्यात आली.
स्थानिक मत्स्य शेतकरी निनाद गड्डमवार यांनाही पेंढरी मत्ता सारख्या गावपातळीवर एनके. ॲक्वाकल्चर सारखी हॅचरी PMMSY मुळे निर्माण करता आली.
त्यामुळे धकाधकीच्या प्रवासापासून मुक्ती आणि पैसा व वेळही वाचतो आहे.
स्थानिक शेतकरी मत्स्य तलावाचा वापर केवळ मत्स्यशेतीसाठीचं नव्हे तर इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन सुधारण्यासाठी देखील करतात. मत्स्य तलावाचे पाणी माशांसाठी अयोग्य झाल्यानंतर (माशांच्या मलमूत्रामुळे) ते विल्हेवाट लावण्यासाठी उघड्यावर उपसण्याऐवजी त्याचा वापर शेतात सिंचनासाठी केला जातो.
त्यामुळे युरिया आणि डीएपी सारख्या खतांचा वापर कमी झाला आहे. आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दर्जा देखील वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या” माध्यमातून'निळ्या-क्रांती' चे 'अर्थ-क्रांती' मध्ये रूपांतर करण्याची किमया साधली आहे अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.