🪙 गोंडपिपरी ते चिमूर धानपट्टा तांबे-सोन्याचे क्षेत्र म्हणून विकास पावेल काय?
चंद्रपूर, दि. ०४ डिसेंबर २०२२.
महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील चंद्रपूर जिल्हा हा येथील कंपन्या-उद्योगांनी परिपूर्ण असलेला जिल्हा म्हणून आज जगाच्या नकाशावर ठळक दिसत असला तरी, हे तितकेसे खरे नाही.
एकीकडे जिल्ह्यातील “चंद्रपूर-बल्लारपूर-राजुरा-कोरपना-भद्राती-वरोरा” असा तालुकानिहाय पट्टा कंपन्या-उद्योगांनी भरभराटीस पावला असला तरी “गोंडपिपरी-पोंभुर्णा-मुल-सावली-सिंदेवाही-ब्रम्हपुरी-चिमूर” हा पट्टा कंपन्या-उद्योगांअभावी दुर्लक्षिला गेला आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर धानाची शेती करत असून असून हा भाग धानपट्टा म्हणून सुपरिचित आहे.
तथापि रब्बी हंगामात धानाचे उत्पादन झाले की पुढील चार-सहा महिने या भागातील नागरिक उदरनिर्वाहासाठी कंपन्या-उद्योग असणार्या भागात अर्थार्जनासाठी जात असतात. आपल्या तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उद्योग वा कंपन्या नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणावर स्थानिक युवकही गेल्या कित्येक वर्षांपासून “पुणे-औरंगाबाद-नाशिक” सारख्या भागात रोजीरोटीसाठी जाण्याचे चित्र अधिक गडद होत चालले आहे.
अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपुर जिल्ह्यात आणि विशेषतः सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी व चिमूर तालुक्यातील बामणी या गावांनजीक सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर स्थानिकांमध्ये रोजगारासाठीच्या मोठ्या आशा पल्लवित होत असतांना दिसत आहेत.
यासंदर्भातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हा सोन्याचा साठा दोनच जागी स्वतंत्र नसुन यामध्ये तांब्याचा मोठा साठा मिसळलेला आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगेच्या काठावर असलेल्या गोंडपिपरी ते चिमूर तालुक्यापर्यंत जवळजवळ २०० किलोमीटरच्या परिसरात हा तांब्या-सोन्याचा साठा पसरलेला आहे. अशी माहिती पुढे येत आहे.
नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या साठ्याचा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये अभ्यास करण्यात आला होता. त्याचा अहवाल केंद्रीय खाण मंत्रालयाला नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, मध्य क्षेत्र, नागपूर यांनी सादर केला. हा अहवाल आता सार्वजनिक करण्यात आला आहे. दोन भूवैज्ञानिकांनी हा अभ्यास केला आहे. ज्यात चिमुर तालुक्यातील बामणी आणि सिंदेवाही जवळील मिनघरी यांचा समावेश आहे.
या दोन ठिकाणी याआधी केलेल्या अभ्यासात, जी ४ अंतर्गत २.५ चौरस किमी व जी ३ अंतर्गत १.८५ चौरस किमी आणि १७४६.९ मीटर खोलीपर्यंतच्या खनिज स्थितीचा शोध घेतला गेला आहे.
त्यामध्ये n जी ३ अंतर्गत बामणीमधील ०.४ चौरस किमी आणि मिनघरी ब्लॉकमधील १.८५ चौरस किमी क्षेत्राचे मूल्यांकन केल्या गेले. ज्या अंतर्गत मिनघरी ब्लॉकमध्ये तांब्याचे प्रमाण २६ पीपीएम (पार्ट प्रतिमिलियन) ते २३०० पीपीएम आढळले आहे. सोन्याचे प्रमाण २५ पीपीबी (प्रतिअब्ज भाग) ते ११० पीपीबीपर्यंत आढळले आहे. तर बामणी ब्लॉकमध्ये तांब्याचे प्रमाण ३३५ पीपीएम ते २४०० पीपीएम दाखवते. हा प्राथमिक अंदाज असून यामध्ये अधिक सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.
ज्याचा फायदा देशाला आणि अर्थातच मागील कित्येक वर्षांपासून उद्योगविरहित असलेल्या या धानपट्ट्याला नक्कीच होईल.