चंद्रपूर, दि.०५ डिसेंबर २०२२
शहरातील रामाळा तलावाचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आदी कामांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी आढावा घेतला.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगनंथम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, प्रकल्पाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, मत्स्यव्यवसाय विभागाचे निखील नरड, इको – प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, रामाळा तलाव वाल्मिकी मच्छिमार सह. संस्थेचे अध्यक्ष बंडू हजारे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, रामाळा तलावाची स्वच्छता व फुट ब्रीजचे बांधकाम करावयाचे आहे. सद्यस्थितीत तेथे सोडण्यात आलेले सर्व मासे डिसेंबर अखेरपर्यंत काढून घेतल्यास त्यानंतर पाणी सोडून ब्रिज व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात येईल. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत नियोजन करावे.
रामाळा तलावातील गाळ काढण्याच्या कामाला जिल्हा खनीज विकास निधीमधून 4 कोटी 98 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर कामाला सुरवात झाली असून एकूण 35 हेक्टर क्षेत्राचे एक मीटर गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे. सद्यस्थितीत 311 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. वेकोली, चंद्रपूर ने रॉ वॉटर रामाळा तलावात सोडण्याबाबत पाईपलाईन टाकली आहे. हे पाणी जलचरांसाठी नुकसानदायक नाही, याबाबत प्रदुषण विभागाने तपासणी करून अहवाल सादर केला आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेने रामाळा तलावात मच्छीनाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याकरीता मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) बांधकामासाठी 18 कोटी 56 लक्ष रुपयांचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. सदर प्रस्तावावर सद्यस्थितीत खनीज विकास निधीमधून प्रशासकीय मंजूरी देण्याचे प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने फूट ओव्हर ब्रिजच्या कामासाठी 4 कोटी 80 लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक केले आहे. यापैकी त्यांना 1 कोटी प्राप्त झाले असून नवीन डिझाइनद्वारे सुधारीत प्रस्ताव बनविण्याचे काम सुरू आहे. तर रामाळा तलाव सौंदर्यीकरणासाठी गोपानी कंपनीकडून सीएसआर फंडचे पाच लक्ष प्राप्त झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी बंडू धोत्रे म्हणाले, फूट ओव्हरब्रिजचे बांधकाम आणि मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) चे बांधकाम करण्यासाठी तलावातील पाणी काढण्यात यावे. पाणी काढून तलाव कोरडा व्हायला किमान दोन महिने लागतील. सद्यस्थितीत यात असलेले मासे काढण्यासाठी मच्छीमार संस्था तयार असल्याचे ते म्हणाले.