मतदार याद्यांबाबत प्रलंबित दावे व हरकती त्वरीत निकाली काढा - विभागीय आयुक्त बिदरी

0
मतदार पुनरिक्षण कार्यक्रमाचा व्हीसीद्वारे आढावा


चंद्रपूर, दि.०५ डिसेंबर २०२२.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यात फॉर्म क्रमांक 6, 7, 8 आणि 8 अ नुसार मतदार याद्यांचे पुनरिक्षण होत आहे. याबाबत नागरिकांचे दावे व हरकती प्राप्त झाल्या असून जिल्हा प्रशासनाने सदर दावे व हरकती त्वरीत निकाली काढाव्या, अशा सुचना मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.


नागपूर येथून व्हीसीद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगनंथम एम., उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पल्लवी घाटगे, उपविभागीय अधिकारी (मूल) महादेव खेडकर, संपत खलाटे (राजुरा), वरोराच्या तहसीलदार रोशन मकवाने, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नामदेव डाहुले आणि मोहित चूग (भाजपा), प्रफुल पुलगमकर (काँग्रेस), विलास सोमलवार (यंग चांदा ब्रिगेड) यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के (ब्रम्हपूरी), प्रकाश संकपाळ (चिमूर) उपस्थित होते. 
मतदार याद्या पुनरिक्षणासंदर्भात विशेष शिबिरे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून जास्तीत जास्त अर्ज प्राप्त होण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे सांगून विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी म्हणाल्या, समाजकल्याण विभागाने जेवढ्या लोकांना दिव्यांगबाबतचे प्रमाणपत्र दिले आहे, त्या सर्वांचा समावेश मतदार यादीत असणे आवश्यक आहे. यातील कोणीही सुटता कामा नये. तसेच तृतीयपंथ नागरिकांची नावेसुध्दा यादीत समाविष्ट करा. 18 – 19 वयोगटातील जास्तीत जास्त तरुण – तरुणींची नावे मतदार मतदार यादीत घेण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विशेष शिबिरे घ्या. प्रत्येक महाविद्यालयातून किमान 25 – 30 नावे आली पाहिजेत. 100 वर्षांवरील मतदारांची संख्या जिल्ह्यात 818 आहे. सर्वच जण हयात असेल तर ही चांगली बाब आहे. मात्र यापैकी कुणी मयत झाले असेल तर अशांची नावे खात्री करून वगळा. 
जिल्ह्यात नामांकित व्यक्ती, तरुण उद्योजक, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले खेळाडू आदींचा मतदार यादीत आवर्जुन समावेश करावा. अशा व्यक्तिंच्या परवानगीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी संदेश प्रसारीत करा. राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर ब्लॉक लेव्हल एजंट नियुक्त करावे. राजकीय पक्षांना प्रारुप मतदार याद्या (सॉफ्ट आणि हार्ड कॉपी) उपलब्ध करून द्याव्यात. तसेच प्रशासनाने प्रारुप मतदार यादी सुचनाफलक, संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. जिल्ह्यात मतदार यादी आधार जोडणीच्या कामाला गती द्या. विशेष म्हणजे मतदार यादी दुरुस्तीबाबत एकत्रित गठ्ठ्याने अर्ज घेऊ नका. नागरिकांचे वैयक्तिक अर्ज स्वीकारा. ग्रामपंचायत, नगर पंचायत / पालिका, महानगर पालिका स्तरावर मृत्युचे प्रमाणपत्र दिले जाते. त्या आधारावर मयत लोकांची नावे कमी करता येऊ शकते. अशा मृत्युप्रमाणपत्राची यादी पुनरिक्षणाचे काम करणा-या केंद्रस्तरीय अधिका-यांना उपलब्ध करून द्या, अशा सुचना मतदार यादी निरीक्षकांनी दिल्या. 



यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यात एकूण 18 लक्ष 391 मतदार असून यापैकी पुरुष मतदार 9 लक्ष 25 हजार 91, स्त्री मतदार 8 लक्ष 75 हजार 259 तर तृतीयपंथ 41 आहे. प्रारुप मतदार यादीपूर्वी (1 जानेवारी ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत) जिल्ह्यात फॉर्म क्र. 6, 7, 8 आणि 8 अ, असे एकूण 83746 अर्ज प्राप्त झाले. यापैकी 77551 स्वीकारण्यात आले असून 7306 प्रलंबित आहे. तर प्रारुप मतदार यादीनंतर (9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2022 या कालावधीत) 10151 अर्ज प्राप्त झाले. यापैकी 6470 स्वीकारण्यात तर 3883 प्रलंबित आहे. जिल्ह्यात 10 नोव्हेंबर 2022 रोजी 823 विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या. यात 2784 मतदारांच्या मतदानकार्डची आधार जोडणी करण्यात आली. तसेच या ग्रामसभांमध्ये 2450 अर्ज प्राप्त झाली असून यात मतदार यादीतून नाव वगळणी केलेल्या मतदारांची संख्या (फॉर्म .7) 993 तर मतदार यादीमध्ये नाव, पत्ता दुरुस्ती अर्जाची संख्या (फॉर्म क्र.8) 559 आहे. जिल्ह्यात 1 जानेवारी ते 13 ऑगस्ट 2022 या कालावधीत एकूण 83425 मतदार ओळखपत्र प्राप्त झाले असून यापैकी 79005 वाटप तर 4420 प्रलंबित असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. 






Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !