Chandrapur Loksabha : मात्र, वाघाची शिकार झाली ?

0


संपादकीय विशेष : चंद्रपूर लोकसभा 

CHANDRAPUR | 16 MARCH 2024
राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर जिल्हा भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद पहावयास मिळत असला तरी राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.


राज्याच्या राजकारणात सुधीरभाऊंचे वाढते महत्व कमी करण्यासाठी 'लोकसभेची तिकीट' पक्षांतर्गत धुरीणांनी खेळलेली नवी खेळी असल्याच्या प्रत्यय राजकीय जाणकारांना येऊ लागला आहे. त्यामुळे ही तर एकप्रकारे 'वाघाची शिकार आहे' असाही संशय व्यक्त होत आहे. 
मागील दहा वर्षात सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कामाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सलग सहा वेळा विधानसभा सदस्य ते संघटनात्मकदृष्ट्या भाजपाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ही मुनगंटीवारांनी यशस्वीपणे आलेली जबाबदारी पार पाडली. 
फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी वेगळी छाप सोडली. खरंतर राज्यात मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार मात्र विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रिय उदयानंतर भाऊ मागे पडलेत. त्यांचे पक्षात अंतर्गत विरोधक वाढलेत. राज्यात ज्या पध्दतीने विविध अंतर्गत विरोधक संपविण्यात ज्यांना यश आले तेच सुधीरभाऊ यांनाही त्याच दिशेने बघत आहेत का? असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडतो आहे आणि हे गेल्या ५-७ वर्षात पदोपदी दिसुन आले आहे. त्यामुळे सुधीरभाऊंना राज्याच्या राजकारणात आणखी वाढू दिले तर आपल्यासाठी जड जाईल याची जाणीव असलेल्या नेतृत्त्वाने केंद्रात आपला वजन वापरून भाऊंना दिल्लीत पाठविण्यासाठी जीवाचे रान केले असावे आणि त्यातूनच मनात इच्छा नसतानाही भाऊंना आता 'चंद्रपूरचा वाघ-दिल्ली दरबारी गुरगुरणार' च्या घोषणेला दुजोरा देत लोकसभा लढवावी लागत आहे. 
तसे पाहता, भाऊंची राजकारणाची सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या मैदाणातूनच झाली. दोनदा पराभूत झाल्यानंतर ते चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आलेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
चंद्रपूर-वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा क्षेत्र असून यंदाची निवडणूक साधी सोपी गोष्ट राहिलेली नाही. त्यातच मागील निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा मोदी लाटेत झालेला पराभव भैय्यांच्या जिव्हारी लागला आहे. अशा परिस्थितीत सुधीरभाऊंसाठी ही निवडणूक सहज म्हणता येणार नाही.

#ChandrapurLoksabha #Chandrapur 
#BJP #SudhirMungantiwar #lokasbhaelection 


 - मादेशवार मंगेश 
(८५५०९०७८१०)
(लेखक चांदा न्यूजचे कार्यकारी संपादक असून राजकारण हा त्यांचा आवडता विषय आहे.) 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !