- प्रशासन अन् लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे खैरी रस्त्याची डागडुजी होईना!
संपादकीय । अरुण मादेशवार
SINDEWAHI | 28 NOVEMBER 2023
शासन आणि रस्ता हे दोन्ही चालण्यासाठी बनवले जातात. सरकार चालत आहे, पण तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभाल होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्तेच खेड्यांत विलिन झाल्याचे दुर्दैव चित्र सद्या परीसरात आहे.
सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागातील कित्येक रस्ते पूर्ण उखडून रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाश्यांना त्रास होत आहे. या मार्गांवर डांबरीकरण करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील रस्त्यांचे सिमेंटिकरण किंवा डांबरीकरण केले जातात. परंतु वर्षभरानंतरही त्यावर दुरुस्ती किंवा डागडुजी केली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच असतात. परिसरातील बहुतांश ग्रामीण रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खोल खड्डे पडल्याने रस्ते खडबडीत झाले आहेत. रस्त्यांच्या दुतर्फाही उरलेल्या नाहीत. त्यांचबरोबर खैरी रस्त्यावर असलेल्या पुलाची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी तर रस्ता उखडून पाच सहा वर्ष उलटून गेले. मात्र आजतगायत दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. दुचाकी किंवा चारचाकी,बस ट्रॅक्टर व ट्रक यांची नेहमी वर्दळ असते. रस्ता पूर्ण उखडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती फारच दयनीय झालेली आहे. त्यामुळे रस्त्यांची स्थिती सुधारावी अशी मागणी केली जात आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.
रस्ते हे विकासाची नाडी असतात. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यन्त उत्तम स्थितीत असणे अत्यावश्यक आहे. परंतू नेमके या बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कित्येक दिवसापासून ग्रामीण जनता या खराब रस्त्यावरून वावरत आहे. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मात्र ग्रामीण रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा करीत आहेत.
ग्रामीण भागात कित्येक दिवसापासून रस्त्याच्या विकासाकडे पहिले जात नाही. एखाद्या ठराविक वेळी लोकप्रतिनिधी च्या पुढाकाराने रस्त्याला निधी मंजूर झाला तर मोठा गाजावाजा करतात. पत्रक काढतात, वर्तमानपत्रात बातम्या छापून येतात. हे सर्व करून मोठी प्रसिद्धी केली जाते. निधीचे आकडेही लाखो - कोटीत असतात. मात्र ही ग्रामीण रस्ते दुरुस्त करीत असतांना थातूरमातुर रस्त्यांची कामे केली जातात व नंतर सहा महिन्यातच रस्त्यांची दूर्दशा होते.
असे थातूरमातुर रस्ते करण्यापेक्षा एकदाच संपूर्ण बजेटमध्ये दर्जेदार करून दाखवले तर ग्रामीण भागाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. दैनंदिन जीवन जगत असतांना या भागातील जनतेला अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. हा परिसर जंगलव्याप्त असल्याने अनेकदा हिंस्र पशुचा सामना करून जीव गमवावा लागतो. विविध राजकीय पक्षांच्या राजकारणात ही गावे विकासापासून वंचीत राहतात. विकासासाठी ग्रामविकास खात्याने ग्रामीण भागातील रस्त्यांचा सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत. यामध्ये खरोखरच कोणत्या गावात रस्ते अथवा इतर सोयीसुविधाची गरज आहे, हे पहावे व सर्व्हे करून ग्रामीण भागाचा विकास करावा. तेव्हाच डिजिटल इंडियात ग्रामीण भागाचा विकास होईल अन्यथा ग्रामीण भागाचा विकास म्हणजे लोकप्रतिनिधींच्या घशात जाण्यासाठीचा सुकर मार्ग होईल, एवढे नक्की!