पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा दिक्षीत (Borda Dixit) येथे गोवाळीतील चारा ७५ वर्षीय वृद्धाच्या मालकीचा बैल खात असल्याने त्याचा बंदोबस्त करण्याच्या किरकोळ वादातून आणि पुर्ववैमनस्यातून किसन लिंगाजी कुमरे (७५) या वृद्धाचा खुन झाल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत वृद्धाच्या मालकीचा बैल गोवाळीतील चारा खात असल्यामुळे त्याचा बंदोबस्त करावा या गोष्टीवरून भांडण पेटून त्याचे रूपांतर खूनात झाले. सदरचे भांडण काल (४ एप्रिल) रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास झाले होते.
या प्रकरणी, पोंभुर्णा पोलिसांनी केशव गेलकीवार (५५) दामोदर गेलकीवार (४०) अक्षय गेलकीवार (३०) शुभम गेलकीवार (२३) तुळशिदास गेलकीवार (२०) व कल्पना केशव गेलकीवार यांना ताब्यात घेतले आहे.
मृतकाच्या खुनानंतर कुटुंबीयांनी सदर मृतदेह हा आरोपीच्या घरी नेऊन ठेवल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केले.
समाजबांधव व कुटुंबानी मृतकाच्या संबंधाने असलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत दारातून मृतदेह न उचलण्याचा पावित्रा घेतल्याने गावात बराच वेळ तणावपूर्ण वातावरण होते.
सदर घटनेचा पुढील तपास पोंभुर्णा पोलिस करीत आहेत.