जि. प. कडून कारवाईत दिरंगाई, ग्रामस्थ आक्रमक
CHIMUR। 22 April 2023
पंचायत समिती चिमूर अंतर्गत गट समन्वयक (कंत्राटी)
पदावर कार्यरत असलेल्या गणेश रामटेके यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर तयार करण्यात येत असलेल्या शौचालय बांधकामात हजारो रुपयांची अफरातफर करून प्रशासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गणेश रामटेके यांना पं. स. चिमूर येथे कंत्राटी तत्त्वावर गट समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असताना त्यांनी आपल्या अखत्यारीत येणाऱ्या नियमित पाणी गुणवता तपासणी, अंगणवाडी व शाळांना भेटी आणि अहवाल सादर करणे इ. कामांना डावलून प्रशासनात असलेल्या दबदब्याचा वापर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामपंचायत स्तरावरील शौचालय बांधकामाचे कंत्राट मिळवत कागदावरच शौचालय बांधून शासकीय निधीचा लाटण्याचा काम केल्याची तक्रार जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. परंतु सदर तक्रारीवर अद्यापही काहीच कारवाई झाली नसल्याने प्रशासनातील अधिकारीच शासनाच्या फसवणूकीला पाठबळ देऊन भ्रष्ट्राचाऱ्यांना अभय देत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
कंत्राटी कर्मचारी गणेश रामटेके यांनी चिमूर तालुक्यातील खानगाव ग्रामपंचायतीला गावात शौचालय बांधकाम पुर्ण झाले असे दाखवून संबधित ग्रामसेवकाकडून ६० हजार रुपयांच्या धनादेशाला चुणा लावला. एकिकडे शासनाचा कंत्राटी कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असतानाच गणेश रामटेके यांनी खानगावात कंत्राटदार म्हणून कामे करण्याचा पराक्रम केला. (खर्चाचे प्रमाणकाची प्रत जोडली आहे) त्यामुळे शासकिय कार्यालयात मानधनावर कार्यरत असतांना शासकिय कामाचा वेळ स्वत:च्या ठेकेदारीमध्ये वापरून चुकीच्या मार्गाने शासनाच्या पैशाचा अपहार करण्याचे काम त्याने केले आहे. त्यामुळे या धक्कादायक प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून जिल्हा परिषदेने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.