🌊‘चला जाणूया नदी ला’ अभियान!
चंद्रपूर, दि. ७ जानेवारी २०२२.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदिला’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील निवड झालेल्या उमा नदीच्या संवाद यात्रेचा शुभारंभ जिल्हा प्रशासन, प्रभु फाउंडेशन व श्री. गुरुदेव गुंफा समिती गोंदेडा (ता. चिमुर) यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे यांनी भूषविले. उमा नदी संवाद यात्रा शुभारंभ कार्यक्रमाचे उदघाटक तथा ‘चला जाणुया नदीला’ अभियानचे नोडल अधिकारी पवन देशट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी राजेश राठोड, आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या डॉ. वीणा काकडे, गुरुदेव गुंफा समिती गोंदेडाचे अध्यक्ष विठ्ठल सावरकर, प्रभु फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल गुळघाणे तथा उमा नदी प्रहरी सदस्य अजय काकडे, डॉ.चौधरी, श्री. पिसे, डॉ. रविन्द्र शेंडे आदी उपस्थित होते.
डॉ. कोकोडे यांनी अध्यक्षीय भाषणात नदी संवर्धन काळाची गरज असून नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले. श्री. देशट्टीवार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात नदी संवाद यात्रेत शासनाचा सहभाग आणि ग्रामस्थाची भूमिका याबाबत मनोगत व्यक्त केले.
त्यासोबतच डॉ. काकडे यांनी नदी की पाठशाला बाबत मार्गदर्शन केले. राहुल गुळघाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून नदीचा संपूर्ण अभ्यास करून नदीचे पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करता येईल आणि नदीला अमृत वाहिनी कसे करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन अनिल गुरुनुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभु फाउंडेशनचे सहायक अंकुश बावणे, अविनाश शेंडे, अजय वाडके, रविन्द्र वाढई, पृथ्वी डांगे आदींचे सहकार्य लाभले.