युवक दिन हा तरुणांसाठी संकल्प दिन व्हावा !

0


वन तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन..

चंद्रपूर, दि. १२ जानेवारी २०२३.
‘हम दुनिया को जानते है.. पर खुद को नही पहचानते है...’ अशा परिस्थितीतून सध्या तरुणाई जात आहे. त्यामुळे तरुणाईने आपल्यात व्यापक बदल घडविणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन अर्थात युवक दिन हा केवळ कथांपुरता मर्यादीत राहु नये, तर तो संकल्प दिन व्हावा असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.



चंद्रपूर येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा संकल्प पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, नामदेव डाहुले, अनिल डोंगरे, विवेक बोढे, अमित गुंडावार, स्वाती देवाळकर, मिथिलेश पांडे, इमरान खान, श्रीनिवास जंगम, ओम पवार उपस्थित होते.


आपल्या मार्गदर्शनात मुनगंटीवार म्हणाले की, बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बुद्धीची कसोटी ईतरांच्या भल्यासाठी वापरली पाहिजे. पुस्तक वाचायचे दिवस आता कमी होत चालले आहे. याचा अर्थ असा नाही की ज्ञानाचे आदान-प्रदान होणार नाही. पुस्तकांची जागा आता ‘स्टोरीटेल’ने घेतली आहे. याच ‘स्टोरीटेल’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र टेल’चा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. येत्या चार ते पाच महिन्यात हा उपक्रम सुरू होईल.

आपल्यापैकी सर्वांना भारतीय,महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान असलाच पाहिजे. परंतु हा अभिमान असताना आपल्या जिल्ह्याची अस्मिता विसरून चालणार नाही, असे ते म्हणाले. चंद्रपूरला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाची योग्य जपणूक, संवर्धन झाले पाहिजे. सर्वांना एकत्र येत यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. भगवान श्रीकृष्ण एकट्याने गोवर्धन पर्वत उचलू शकले असते; परंतु त्यांनी सर्वांचे सहकार्य घेतले. अशाच एकमेकांच्या योगदानाने समाजाची प्रगती, उन्नती होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने समाज घडविण्यासाठी युवा दिनी संकल्प करावा.



भविष्यात कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारे पाश्चात्य वातावरण तयार होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध होत समाजासाठी योगदान देण्याची गरज आहे. यासाठी तरुणाईच पुढे येऊ शकते, कारण चांगली तरुणाई जेव्हा सकारात्मक पद्धतीने पुढे येऊन सूत्र हाती घेईल तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता होईल व जग आपल्यापुढे झुकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘दुनिया बदलने वाले को अगर आप ढुंढ रहे हो, तो एकबार आईने में देख लो.. दुनिया बदलने वाला दिख जाएगा...’, असे नमूद करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तरुणाईमध्ये स्फुरण भरले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !