सांस्कृतिक, क्रीडा, व समाजकार्याचा वारसा जपणाऱ्या ब्रम्हपुरी महोत्सव - २०२३ चे 12 जानेवारी पासून आयोजन

0

माजी मंत्री वडेट्टीवार यांची संकल्पना -  सिनेकलावंतांच्या बहारदार कार्यक्रमाची मेजवानी.. 

ब्रम्हपुरी, दि.9 जानेवारी 2023
मागील दोन वर्षाच्या कालखंडात कोरोना या वैश्विक महामारीने ब्रह्मपुरीकरांच्या आनंदात विरजण घातले होते.  मात्र यंदा नववर्ष 2023 च्या प्रारंभी माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक, क्रीडा, प्रबोधन, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य शिबीर, समाजसेवेची  परंपरा कायम राखत ब्रम्हपुरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. सदर महोत्सवाची दिमाखात जय्यत तयारी सुरू असून प्रसिद्ध कलावंत, सिनेस्टार, यशस्वी जीवनाची दिशा देणारे मार्गदर्शक, तज्ञ डॉक्टरांच्या आरोग्य शिबीर, हास्य कलाकार यांच्या उपस्थितीत व स्थानिक कलावंतांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धेच्या माध्यमातून दि.12 ते 15 जानेवारी दरम्यान ब्रह्मपुरी महोत्सव- 2023 रूपाने नागरीकांना भन्नाट व बहारदार कार्यक्रमाची मेजवानी दिली आहे.


आयोजीत महोत्सवाचा प्रारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता  नगर स्वच्छतेतून होणार असून यादरम्यान सकाळी 10 वाजता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याकरिता उत्कृष्ट रांगोळी स्पर्धा, दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाकी प्रदर्शन व प्रभात फेरी यात सिने अभिनेत्री आदिती गोवित्रीकर, प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.तर सायंकाळीं 5.30 वाजता सुरू होणाऱ्या कृषि प्रदर्शनी व महोत्सव उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण, अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार, आ. सुभाष धोटे, जेष्ठ राजकिय वेश्लेषक ,विचारवंत राजू परुळेकर, महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्ती संपादक श्रीपाद अपराजित, जेष्ठ सिने अभिनेते असराणी, प्रसिद्ध सिनेस्टार दबंग चित्रपट फेम, सोनू सूद यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच रात्री 7 वाजता नागरिकांच्या विशेष आकर्षणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात विनोदी हास्यकल्लोळाने सर्व दूर परिचित असलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदविरांच्या चमुचा कार्यक्रम सादर होणार आहे.


तर दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता ब्रह्मपुरी व परिसरातील खेळाडूंचा उत्साह वाढविण्याकरिता विविध वयोगटातील खेळाडूंसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महिला पुरुष यांच्या आरोग्य तपासणी करिता विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन तर दुपारी 2 वाजता टीव्ही मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचे विशेष आकर्षण कार्यक्रम म्हणून नावलौकिकास आलेल्या प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते आदेश बांदेकर यांचा गृहमंत्री (होम मिनिस्टर) हा लक्षवेधक स्पर्धा कार्यक्रम किरणताई विजय वडेट्टीवार व ब्रह्मपुरी नगरपरिषद पदाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. यानंतर सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस, विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत सौंदर्य स्पर्धा मिस व मिसेस ब्रम्हपुरी कार्यक्रमात ब्रह्मपुरी येथील तरुणी व महिला यांच्या उत्स्फूर्त सहभागात स्पर्धा पार पडणार आहे, तसेच जगातील अनेक देशांमध्ये आपल्या मधुर आवाजाने कोट्यावधी नागरिकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जाणारे इंडियन आयडल विजेते सलमान अली व लिटिल चॅम्प्स विजेते मनी यांच्या गायनाचा सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा उत्तरार्ध दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर सकाळी 9 वाजता पतंग स्पर्धा, दुपारी 2 वाजता विदर्भातील युवकांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणारे मोटिवेशन स्पीकर प्रा. नितेश कराळे यांची विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तर रात्रौ 7 वाजता स्थानिक कलावंतातील सुप्त गुणांचे दर्शन घडविणाऱ्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


ब्रह्मपुरी महोत्सवाचा अंतिम दिवस म्हणून दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ज्येष्ठ नागरिक व नामवंतांचा सत्कार, दुपारी 3 वाजता कुकिंग कॉम्पिटिशन स्वरूप आनंद मेळावा, रात्रौ 7 वाजता संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुमधुर गीतांनी रिझविणारे प्रख्यात गायक आदर्श शिंदे यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम, तर महत्त्वाचा अंतिम टप्पा नागरिकांच्या विशेष आनंदोत्सवासाठी रात्री 10 वाजता डीजे नाईट अशा विविध दिलखेचक, मनमोहक बहारदार कार्यक्रमांची मेजवानी ब्रह्मपुरी कर व परिसरातील नागरिकांसाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून मिळणार असून आयोजित चार दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सव 2023 च्या कार्यक्रमाचा आस्वाद व आनंद अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ब्रह्मपुरी महोत्सव समिती ब्रह्मपुरी च्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !