🪷चंद्रपूर जिल्ह्यात भाजप पहिल्या नंबरवर!
🔸पण, दिग्गजांच्या मतदारसंघात निराशाजनक निकाल!
चंद्रपूर, दि. २० डिसेंबर.
जिल्ह्यात ५९ ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे ५८ ग्रामपंचायतींसाठी १८ तारखेला मतदान पार पडले. त्याचा निकाल आज जाहीर झाला असून जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतींवर भाजप व युतीचे सरपंच विराजमान झाल्याने पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीपैकी भाजपाने २४ जागा व युतीत ४ जागा असे एकूण २८ जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादित केले. त्यानुसार नागभिड तालुक्यात भाजपाने १, सिंदेवाही येथे २ पैकी २, सावली येथे १, चिमुर येथे २, बल्लारपूर येथे २, भद्रावती येथे ५, राजुरा येथे १, पोंभुर्णा येथे १, कोरपना येथे भाजप २ तर युतीत ४, जिवती येथे २, मुल येथे ३ अशा जागांवर भाजपाने विजय संपादित केला आहे. तर कॉंग्रेसने २१ राष्ट्रवादीने २, शिवसेना (ठाकरे गटाने) २, शेतकरी संघटना ०३, गोंडवाना गणतंत्र पार्टी ०१ तर अपक्ष २ याप्रमाणे ग्राम पंचायत निवडणूकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत.
मागील वर्ष-दोनवर्षामध्ये जिल्ह्यात झालेल्या ग्रा.पं. निवडणुकींचा निकाल बघता जानेवारी २०२१ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना सुद्धा तत्कालीन ६०० ग्रामपंचायतींच्या निवडणूकांत जवळपास ३४० च्या वर ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने सत्ता काबीज केली होती. यासोबतच याचवर्षी ऑक्टोंबर महिन्यात पार पडलेल्या ९४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतही तब्बल ४७ जागी विजय संपादित करून भाजपने विजयी बहुमान राखला होता. आणि आजच्या निकालात पुन्हा एकदा मुसंडी मारत ५९ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आल्याने याचा फायदा पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जि. प. व पं. स.) निवडणूकीत भाजपला निश्चितचं होईल. असे दिसून येते आहे.
गत निवडणुकीचे एकूणच चित्र बघता जिल्ह्यातील ग्रामीण जनतेने पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे स्पष्ट होत असले तरी विकासपुरुष मुनगंटीवारांना त्यांच्या मतदारसंघातील मुल तालुक्यात सात ग्रामपंचायतींपैकी ३ जागा, बल्लारपूर तालुक्यात पाच ग्रामपंचायतींपेकी २ जागा तर पोंभुर्णा तालुक्यात दोन ग्रामपंचायतीपैकी १ जागेवरच समाधान मानावे लागले आहे.
अशीच काहीशी परिस्थिती माजी मंत्री व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा गड समजल्या जाणाऱ्या सिंदेवाही तालुक्यात दिसून येते. तालुक्यातील पेंढरी व नांदगाव या दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला आहे.
याबरोबरच नागभिड तालुक्यात पाच पैकी ४ जागा जिंकत काँग्रेसने भाजप आमदाराच्या मतदारसंघात चांगली ओपनिंग केल्याचे दिसते. परंतू तिकडे काँग्रेसचे पावरफुल आमदार असलेल्या भद्रावती तालुक्यात मात्र सात जागांपैकी १ जागेवर काँग्रेसला विजय मिळविता आला असून राजूरा विधानभेत भाजपनेच पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.