चंद्रपूर, दि. 27 डिसेंबर 2022.
श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त विसापूर येथे वनस्पती उद्यानाचे प्रतीक चिन्ह अनावरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला.
या सोहळ्यादरम्यान बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली येथील ग्रामीण भागातील महिलांमार्फत तयार करण्यात आलेल्या बांबू निर्मित वस्तूच्या केंद्रास राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान बीआरटीसी मार्फत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती घेऊन त्यांच्या हस्ते वनस्पती उद्यानाच्या प्रतीक चिन्हाचे अनावरण बीआरटीसी निर्मित बांबू वस्तूमार्फत करण्यात आले. सर्वप्रथम हा मान या बांबू वस्तूंना मिळाल्याने त्याची प्रशंसा वनमंत्री व उपस्थितांनी केली.
संचालक अविनाशकुमार यांच्या नेतृत्वात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे महिलांना रोजगार देणारे व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी सक्षम यंत्रणा असल्याचे नमूद केले. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. त्याद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे समाधान व्यक्त केले. याबाबत संपूर्ण बीआरटीसी टीमचे त्यांनी कौतुक केले. यावेळी केंद्राचे संचालक अविनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. मल्लेलवार, पर्यवेक्षिका योगिता साठवणे, हस्तशिल्प निर्देशक किशोर गायकवाड व इतर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.