💥 सिंदेवाही ब्रेकिंग !
⭕ या भागात पहिल्यांदाचं अस्वल, नागरीकांमध्ये भितीचे वातावरण!
💠वनविभागाने तातडीने अस्वलाचे बंदोबस्त करण्याची नागरीकांची मागणी.
सिंदेवाही, दि. १५ डिसेंबर.
मॉर्निंग वाकला गेलेल्या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना सिंदेवाही शहरानजीक असलेल्या रेल्वेस्टेशन-जिटीसी रोड परिसरात आज सकाळी ०६ च्या सुमारास घडली.
नंदू सिताराम शेंडे (५०)असे हल्ला झालेल्या इसमाचे नाव असून ते सकाळी फिरण्यासाठी गेले असता अचानक समोरासमोर आल्याने अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही डोळ्यांना, नाकाजवळ आणि डाव्या कुशीत गंभीर दुखापत झाली झाल्याने त्यांचेवर ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सालकर यांच्या नेतृत्वात वनविभाग करीत आहे.
सिंदेवाही रेल्वे स्थानकापासूनच झुडपी जंगल सुरू होत असल्याने जिटीसी (ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर) ते शासकीय आयटीआय पर्यंत असणार्या लोकवस्तीत अनेकदा नागरिकांना जंगली श्वापदांचे दर्शन होत असतात. पट्टेदार वाघ, बिबट, रानडुक्कर इ. अनेक प्राण्यांचा या भागात नियमित वावर आहे. परंतू आज पहिल्यांदाच अस्वलाचे तिच्या पिल्ल्यासह दर्शन देऊन अचानक हल्ला चढवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याच रस्त्याने सिंदेवाहीकर मोठ्या संख्येने नियमित सांज-सकाळ फिरायला जातात, जवळच शासकीय आयटीआय व आदिवासी मुलांचे शा. वसतिगृह असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांची दिवसभर ये-जा असते. लोनवाही-गडमौशी परिसरातील महिलाही सरपण गोळा करण्यासाठी या भागात फिरत असतात. एकूणच कच्चेपार, गुंजेवाही-पवनपार आणि पाथरी कडे येणा-जाणार्यांचा हा प्रमुख रस्ता असल्याने भविष्यात असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागाने सदरहू हल्ला गांभिर्याने घेत तातडीने अस्वलाचे व तिच्या पिल्लाचे बंदोबस्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.